Homeप्रदेश" काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब यांच्या नेतृत्वात साडेपाच वर्षे...

” काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब यांच्या नेतृत्वात साडेपाच वर्षे आंदोलन करण्यात आले…तरी देखील प्रवेश मिळालाच नाही…..!” हे ऐतिहासिक सत्य समजून घ्या.

आम्ही हिंदू आहोत ,म्हणून आम्हाला इतर हिंदुंप्रमाणेच हिंदूच्या मंदिरात जाण्याचा,पूजा करण्याचा हक्क असला पाहिजे या माणुसकीच्या तात्विक मागणीसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या समोर मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून हे ऐतिहासिक आंदोलन करण्यात आले होते.
2 मार्च 1930 रोजी हे आंदोलन सुरू झाले ते जुलै 1935 पर्यंत सुरू होते.
अखेर ….मंदिरात प्रवेश मिळत नाही हे बघून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाईलाजाने आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला.
“….मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साडे पाचवर्ष चाललेले हे जगातील एकमेव आंदोलन असावे….!”
या आंदोलनात हिंदु धर्म व्यवस्थेने अस्पृश्य म्हणून वाळीत टाकलेल्या महार, मातंग , चर्मकार , मेहतर ई . अशा विविध जातीचे हजारो लोकं सामील झाले होते.
या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला.
इंग्लंड मध्ये मानवी हक्कांच्या भारतातील परिस्थितीची चर्चा चालू झाली. इंग्लंडचे म्हणजे ब्रिटिशांचे तेव्हा जगावर साम्राज्य होते.
साडेपाच वर्षात या आंदोलनकर्त्यांकडून कोणतेही हिंसात्मक कृत्य घडले नाही.
मंदिर व्यवस्थापन आणि भट , पुजाऱ्यांनी आतून मंदिराचे दरवाजे बंद केले होते.कर्मठ हिंदूंचा , उच्चवर्णीय हिंदूंचा त्यांना पाठिंबा होता.
आतल्या बाजूने बाहेरील आंदोलकांवर दगड फेक होत असायची .त्यात असंख्य आंदोलक जखमी झाले होते.
परंतु बाबासाहेबांनी कोणतेही गैरकृत्य करू नका .कायद्याचे उल्लंघन करू नका असा आदेश दिल्याने आंदोलक शांतपणे मंदिराच्या बाहेर बसून मंदिर उघडण्याची वाट बघत बसायचे.
“आम्ही तुमच्या प्रमाणेच माणूस आहोत.आम्हालाही तुमच्या प्रमाणेच जगण्याचा हक्क असला पाहिजे . आम्ही हिंदू धर्माचे आहोत. आम्हाला आमच्या धर्मात पक्षपाती वागणूक का दिली जाते?…..असा बाबासाहेबांचा सवाल होता…..
” हा निव्वळ मंदिर प्रवेशाचाच सत्याग्रह नव्हता तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळाला पाहिजे ही मानवी हक्काची मागणी त्यात होती.”
पण त्यावेळच्या सनातनी आणि धर्ममार्तडांनी आपल्याच धर्मातील समस्त मागासलेल्या जातींना समान हक्क नाकारले .मंदिर प्रवेश नाकारला.


अखेर हा सत्याग्रह थांबविण्यात आला.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहाच्या अपयशाने खूप निराश झाले होते.पण त्यांनी खचून न जाता. त्यावर मार्ग शोधला…..
या अगोदर पुणे येथील पर्वती येथील मंदिरात देखील असाच प्रवेशाचा प्रयत्न त्या वेळच्या महार लोकांनी केला होता.तो देखील सनातनी लोकांनी हाणून पाडला होता.
मागासलेल्या जातीच्या लोकांना (त्यावेळी त्यांचा उल्लेख ‘ अस्पृश्य ‘ असा केला जाई) सार्वजनिक ठिकाणावरून पाणी पिण्यास बंदी होती. शिक्षण बंदी होती. गावात प्रवेश करण्याची बंदी होती. स्वतःचा उद्योग , व्यवसाय करण्याची बंदी होती. शेती करू दिली जात नव्हती. अशा पद्घतीच्या असंख्य गोष्टींच्या बंदी हिंदू धर्म व्यवस्थेने म्हणजेच मनुवादी व्यवस्थेने लादलेल्या होत्या. महार , मातंग , चर्मकार , मेहतर या आणि अशा असंख्य मागासलेल्या अस्पृश्य जातींना माणूस म्हणून जगण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. कोणतेही हक्क नव्हते. या विरोधात जो जाईल त्यास कठोर अशा यातना देणाऱ्या शिक्षा दिल्या जात. मरेपर्यंत मारणे , कान कापणे , जीभ कापणे , हात कलम करणे , कानात गरम शिसे ओतणे ,काही वेळा ठार देखील मारले जाई. अशा शिक्षा दिल्या जात होत्या. हा सर्व अन्याय उघड उघड धर्माच्या नावाने चालत होते. न्याय मागायचा तरी कोणाकडे….?
या जातींना रस्त्यावर चालण्याची बंदी होती.नवे कपडे घालण्याची बंदी होती. कोणताही सण साजरा करण्याची बंदी होती. फक्त भिक मागून किंवा मेलेले जनावर खावून त्यांना जगावे लागत होते.अशा प्रकारे आपल्याच धर्मातील लोकांना कट्टर सनातनी लोकांनी, धर्म मार्तडांनी सर्व प्रकारच्या जगण्याच्या अधिकारापासून बंदी घातली होती.
जो धर्म आपल्याला ,आपल्या लोकांना ,मागासलेल्या जातींना आपल्याच धर्मात समान वागणूक देत नाही. त्या धर्मात का राहायचे….? असा निर्णय बाबासाहेबांनी घेतला….
आणि 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला.
मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी क्रांतिकारी घोषणा बाबासाहेबांनी याच दिवशी येवला येथे केली होती.
” जगातील महान तत्वज्ञानी,विज्ञान आणि सत्याची कास धरणारा ,स्वातंत्र्य – समता – बंधुता या मानवी मूल्यांची जपणूक करणारा आणि आपल्याच मातीत जन्माला आलेल्या तथागत बुद्धांचा धम्म दि. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी स्वीकारला.”

ज्यांनी त्यावेळी मंदिर प्रवेशाला प्रखर विरोध केला आणि हा सत्याग्रह हाणून पाडला,त्यांच्या अमानवी व्यवहारामुळे आम्हाला मानवतावादी बौद्ध धम्म मिळाला.म्हणून त्या वेळच्या हिंदू धर्माच्या कर्मठ,सनातनी लोकांचे,विशेषत: मंदिराच्या त्या ब्राम्हण पुजाऱ्यांचे जाहीरपणे मनःपूर्वक आभार मानतो.
जयभीम जयभारत

लेखक:-
मा.धर्मभुषण बागुल
(राज्य अध्यक्ष-समता सैनिक दल)
9921323281/7020558011

RELATED ARTICLES

Most Popular