शहरात ९ मार्च रोजी जागतिक स्तरावरील धम्म परिषद आणि बिझनेस एक्स्पो पार पडणार असून, याच धम्म परिषदेच्या पावन सोहळ्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव राज्यभर चमकविणाऱ्या सातरत्नांना ‘मूकनायक बुलढाणा’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे धनी ठरलेल्या कीर्तीवंतांची नावे मुख्य संयोजक सतीश पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहेत.
प्रशासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट सेवा बजावत असलेले बंदरे व गृह मंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ खरात व पुणे येथील उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासह साहित्य क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याला राज्यभर लौकिक मिळवून दिल्याबद्दल नारायणराव जाधव येळगावकर, वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्याबद्दल डॉ. पंजाब हिरे, लष्करीसेवेतील सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट (डीवायएसपी) कॅप्टन मोनिका साळवे, उद्योग क्षेत्रातून डॉ. अर्चित हिरोळे आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल लक्ष्मण साळवे अशा सात रत्नांना ‘मूकनायक बुलढाणा’ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
बुलढाणा येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणावर ९ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्तींना मोठ्या आदराने हा पुरस्कार बहाल केला जाणार असल्याची माहिती जागतिक धम्म परिषद तथा बिझनेस एक्स्पोचे मुख्य संयोजक तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी धम्म बांधवांसह नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सतीश पवार यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, महार रेजिमेंट, बुद्धिस्ट टिचर्स असोसिएशन व कास्ट्राइब संघटनेने केले आहे.